संपादकीय संवाद – मंत्रालयात दारू – सखोल चौकशी व्हायलाच हवी

आपल्या महाराष्ट्रात केव्हा काय घडेल? हे काही सांगताच येत नाही. या महाराष्ट्रात अनेक वर्ष दारूबंदी होती, नंतर दारूबंदी जरी संपली तरी दारूची विक्री आणि दारूचा वापर यावर बरीच बंधने होती. आजही सरकारी कार्यालयांमध्ये तसेच सरकारी विश्रामगृहांमध्येही दारू आणण्यास आणि दारूचे सेवन करण्यास मनाई आहे.
तरीही महाराष्ट्राच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडल्याच्या बातमीने आज उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. आज ज्या मंत्रालयात दारू आणण्यास मनाई आहे तिथे दारूच्या बाटल्या अर्थात रिकाम्या बाटल्यांचा खच सापडतो यात काहीतरी गौडबंगाल निश्चित आहे. आता सरकारसमर्थक म्हणतील की बाटल्या रिकाम्या होत्या त्यात दारू कुठे होती? मात्र रिकाम्या बाटल्यांचा खच सापडतो म्हणजे आधी या भरलेल्या बाटल्या कुणीतरी आणून त्या रिचवले गेल्या असल्या पाहिजे. आणि ज्याअर्थी खच सापडला आहे त्याअर्थी अनेक दिवस अनेकांनी या परिसरातच बसून हे अपेयपान केले असले पाहिजे. अन्यथा या रिकाम्या बाटल्या नेणार तरी कश्या ? हा प्रश्न निर्माण होतो.
अर्थात सरकारसमर्थक म्हणतील की बाहेरून कुणीतरी रिकाम्या बाटल्या आणून साठवून ठेवल्या असतील असाही युक्तिवाद केला जाईल की, या बाटल्या दुसऱ्या काही वापरासाठी आणल्या गेल्या असतील. मग प्रश्न असा निर्माण होतो की या कुणीतरी भांगरमध्ये रिकाम्या बाटल्या विकत घेऊन कुठेतरी साठवून ठेवायच्या तर मंत्रालयातील खोली शोधली काय?
हे सर्वच तर्क हास्यास्पद आहेत. आज या देशात दारूने अनेक कुटुंबांची कशी धूळधाण केली हा इतिहास ताजा आहे. मात्र दारुसामर्थक म्हणतात की दारूबंदी केली तर शेकडोंचे रोजगार जातील. काही वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून महिलांनी आंदोलन केले. त्याला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस सरकारने चंद्रपुरात दारूबंदी केली, दरम्यान सरकार बदलले चंद्रपूरचे नवे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला चंद्रपुरात दारूबंदीमुळे अनेक संसार उध्वस्त झाले असा म्हणे त्यांना साक्षात्कार झाला होता, म्हणून त्यांनी दारूमुक्ती केली. एकंदरीत महाआघाडी सरकार आता मंत्रालयात आणि सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये दारू आणायला परवानगी देणार असे समजायला काही हरकत नाही.
मंत्रालय परिसरात सापडलेला हा रिकाम्या बाटल्यांचा खच राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपाहारगृहाच्या खालच्या एका रिकाम्या खोलीत असल्याचे बोलले जाते. आता राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपल्या कक्षात बसून अपेयपान केले आणि रिकाम्या बाटल्या चपराश्याच्या हातून त्या रिकाम्या खोलीत नेऊन टाकल्या असे झाल्याची शक्यता आहे. कदाचित उपहारगृहात चोरून अधिकारी अपेयपान करत असतील ही शक्यता देखील नाकारता येत नाही. मंत्रालयात राजपत्रित अधिकाऱ्यांची रेलचेल आहे. म्हणजे बहुसंख्य राजपत्रित अधिकारी आपल्या दालनात अपेयपान करीत असतील काय? आणि तसे होत असल्यास या भरलेल्या बाटल्या रिकाम्या करण्यासाठी ते बागेत भरून आणतात की आणखी कुणी त्यांना पुरवतो? हा ही पुन्हा संशोधनाचाच विषय ठरेल. सर्वात महत्वाचे म्हणजे मंत्रालयात इतक्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या पोहोचतात याचा अर्थ सुरक्षा व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता या प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणातील नेमके सत्य जनतेसमोर यायला हवे. हे सत्य जाणण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच आहे.


अविनाश पाठक

Leave a Reply