पोलिसांची धरपकड, विदर्भवाद्यांचे आंदोलन सुरूच

नागपूर : १० ऑगस्ट – वेगळे राज्य, वीज बिल कमी करा आणि इंधनाची दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाने मंगळवारी दुसऱ्या दिवशी नाट्यमय वळण घेतले. सुमारे साडे तीन तास विदर्भवादी आणि पोलिसांमध्ये लंपडाव चालला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन मुक्त करताच परत धरणे सुरू झाले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या झेंड्याखाली शहीद चौकातील विदर्भ चंडिकेसमोर ठिय्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून नेल्याने स्थिती तणावपूर्ण झाली होती. आंदोलनस्थळी लावलेले बॅनर्स काढण्यात आले. तसेच, अन्य साहित्यही पोलिसांनी उचलून नेले. सकाळी दहा वाजताच्या सुमारे समितीचे मुख्य संयोजक राम नेवले व काही कार्यकर्ते येताच पोलिसांनी अडवले आणि वाहनात कोंबून तहसील ठाण्यात नेले. एक ते दीड तास ५-१० कार्यकर्त्यांचे जत्थे येताच पोलिस त्यांना लगेच ताब्यात घेत होते. समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनाही ठाण्यात नेण्यात आले. महिला आघाडीच्या प्रमुख रंजना मामर्डे, झोपडपट्टी विभागाच्या प्रमुख ज्योती खांडेकर, दिव्यांग सेलच्या जिल्हाध्यक्ष उषा लांबट यांना अक्षरश: फटफटत नेल्याचा आरोप समितीच्या नेत्यांनी लावला.
ठिय्या बंद करण्याची ताकीद देऊन पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मुक्त केले. मात्र, आंदोलन करण्यावर विदर्भवाद्यांनी ठाम भूमिका घेतली. तहसील ठाणे व शहीद चौकाच्या मार्गातील टांगा स्टँड चौकात आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. अखेर पोलिसांनी त्यांना शहीद चौकात जाण्याची परवानगी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले. पोलिसांनी बळाचा वापर करून बॅनर, पोस्टर्स फाडले. कार्यकर्त्यांना भोजन देखील करून दिले नाही. स्वयंपाकाचे साहित्य, शेगडी, सिलिंडरही जप्त केले, असा आरोप राम नेवले यांनी लावला.

Leave a Reply