दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? – प्रवीण दरेकरांचा सवाल

मुंबई : १० ऑगस्ट – मंत्रालयातील अनागोंदी कारभाराचा एका खासगी वृत्तवाहिनीने पर्दाफाश करण्यात आला. या बातमीनंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची १५ दिवसात उच्चस्तरिय चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असल्याचे देखील प्रविण दरेकर म्हणाले.
राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम आणणारी अशी घटना आहे, अशी टीका त्यांनी केली.
या गंभीर प्रकरणासंदर्भात दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र दिले आहे. मंत्रालायात आपले प्रश्न सोडविण्यासाठी दर दिवशी हजारो नागरिक मंत्रालायत येत असतात. पण या नागरिकांना मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव अडवणूक केली जाते. त्यांच्याकडील सर्व सामानाची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यानंतरही त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कधी-कधी प्रवेश नाकारण्यात येतो. सामान्य नागरिकांच्या बाबतीत एवढी दक्षता घेतली जात असताना मंत्रालय उपहारगृह परिसरापर्यंत मात्र दारुच्या बाटल्या सर्रासपणे कशा पोहचतात असा सवालही दरेकर यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची १५ दिवसांच्या आत उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो. सर्वसामान्यांची तपासीणी केल्याशिवाय, पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे.

Leave a Reply