उच्च न्यायालयाने रद्द केली अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी

मुंबई : १० ऑगस्ट – अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोनाच्या काळात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेणे अनावश्यक आणि धोकादायक असून दहावीच्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश करण्यात यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत २ ऑगस्टलाच संपली होती. ही सीईटी सक्तीची नसली, तरी या सीईटीच्या आधारावरच अकरावीचे प्रवेश देण्यात येणार होते. सीईटीमार्फत भरलेल्या जागा उरल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे उरलेले प्रवेश होणार होते. मात्र आता न्यायालयाने सीईटी घेण्यास नकार दिला असून ती रद्द करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीदेखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या परीक्षेसाठी एकूण १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
न्यायालयाचा सीईटी रद्द करण्याचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पूर्ण निकाल अद्याप आपल्याकडे आला नसून नेमक्या कुठल्या कारणांमुळे सीईटी घेण्याला न्यायालयाने विरोध केला, याची माहिती घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
दहावीच्या परीक्षा कोरोना काळामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अकरावीत प्रवेश देण्यासाठी सीईटीचा पर्याय राज्य शासनाने निवडला होता. मात्र आता उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे राज्य सरकारला दहावीच्या गुणांआधारेच अकरावीचे प्रवेश द्यावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी त्यांच्या जीवाशी खेळता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं म्हटल्यामुळे आता सीईटीचा अभ्यास कऱणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचाही हिरमोड होणार आहे.

Leave a Reply