सुपर ७५चे विद्यार्थी देशात व जगात मनपाचे नावलौकीक करतील – महापौर दयाशंकर तिवारी

नागपूर : ९ ऑगस्ट – नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी ते पुढे जाउ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी अंतरीक्षातही झेप घेण्याची जिद्द ठेवतात हे यापूर्वीही दाखवून दिले आहे. या अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना भविष्यात केवळ परिस्थितीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात अडथळे येउ नयेत यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘सुपर-७५’चा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात मनपाच्या शाळेतील ७५ विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होतील. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून मनपाचे विद्यार्थी देशात व जगात नावलौकीक करतील, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त ‘आझादी-७५’ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ‘सुपर-७५’ या मनपाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाद्वारे ‘आझादी-७५’च्या वर्षभराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मनपाच्या महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, शिक्षण समिती उपसभापती सुमेधा देशपांडे, सदस्या परिणिता फुके, संगिता गि-हे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे कार्यकारी सदस्य जयंत गणवीर, मनपाचे सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे आदी उपस्थित होते. यावेळी मनपाद्वारे निवड झालेल्या ७५ विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी सभागृहामध्ये उपस्थित होते तर इतर विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
पुढे बोलताना महापौर म्हणाले, शहराचा प्रथम नागरिक म्हणून पदग्रहण करताना अनेक दिवसांपासून मनात असलेली संकल्पना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नागपूर शहरातील जनतेला त्यांच्या जवळच्या परिसरात आरोग्य सुविधा मिळावी यासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीचे औचित्य साधून ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचे कार्यही सुरू झाले. त्याचवेळी आपल्या मनपाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी प्रतिभा असूनही केवळ परिस्थितीने मागे राहू नयेत यासाठी त्यांच्यासाठी काही करण्याची संकल्पना पुढे आली. बिहारमध्ये आनंदकुमार यांच्याद्वारे ‘सुपर-३०’च्या माध्यमातून ३० विद्यार्थ्यांना जेईई साठी तयार केले जाते. याच धर्तीवर ‘आझादी-७५’च्या अनुषंगाने शहरात ‘सुपर-७५’ उपक्रम सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ अभियांत्रिकीसाठीच नव्हे तर ‘नीट’ आणि ‘एनडीए’ करिता सुद्धा तयार करण्याचे निश्चित झाले, त्यासाठी प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागपूर शहरातील असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटद्वारे यासाठी नि:शुल्क सेवा देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यातून असोसिएशनद्वारे मनपाच्या इयत्ता आठवी मधील सुमारे ८५० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वोत्तम कामगिरी दर्शविणा-या ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम मनपाद्वारे दरवर्षी सुरू राहणार असून भविष्यात हे विद्यार्थी, अभियांत्रिकी क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात किंवा देशाच्या संरक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवून स्वत:सह परिवार आणि आपल्या शहराचे नाव लौकीक करतील आणि नागरिकांच्या मनपाच्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोण सुध्दा बदलेल, असाही विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी निवड झालेल्या ७५ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षणाचा स्तर हा गरीबी आणि श्रीमंतीवर निर्भर नसून तो विद्यार्थ्यांची परिस्थिती व बुद्धिमत्तेवर आहे. ही बाब हेरून नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समिती व विभागाद्वारे स्तूत्य उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्‍यासाठी मनपाने सुरू केलेला उपक्रम पुढेही अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या डोळ्यातील स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा सुद्धा सत्तापक्ष नेत्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देउन त्यांचे आवडीचे करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनपाचे अभिनंदन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नि:शुल्क तयारी करण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मनपाचे विद्यार्थी उत्कृष्ठ शिक्षण घेतील व आपले स्वप्न पूर्ण करतील अशी आशा बाळगून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी ‘सुपर-७५’ची संकल्पना विषद केली. महानगरपालिकेच्या शाळेत शिकणा-या तळागाळातील, गरीब, गरजू विद्यार्थ्यांचे भवितव्य उंचाविण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘सुपर-३०’च्या धर्तीवर ‘सुपर-७५’ही संकल्पना मांडली. यामध्ये शहरातील खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटचे सहकार्य घेउन आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांमधून परीक्षेद्वारे ७५ विद्यार्थ्यांची निवड करायची व त्यातील २५ विद्यार्थ्यांना जेईई, २५ विद्यार्थ्यांना नीट आणि २५ विद्यार्थ्यांना एनडीए साठी तयार करायचे निश्चित झाले. शहरातील खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत नि:शुल्क शिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्य मनपाद्वारे पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply