वर्धा : ९ ऑगस्ट – मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. वृक्षतोड म्हणजे आपण त्यांच्या जागेवर अतिक्रमणच केले. विकासाच्या आड येत असलेले वृक्षतोड करणे ही गरज आहे. परंतु, घर वा व्यावसायिक संकुल बांधण्यासाठी तोडलेल्या वृक्षांनी वातावरणात असमतोल निर्माण झाला. परिणामी, निसर्गानेही आपला झटका दाखवला. कोरोनाच्या काळात तर प्राणवायू विकत घ्यावा लागल्याने झाडांचे महत्त्व लक्षात आले. आपल्या पुढच्या पिढीला प्राणवायूची कमतरता जाणवू नये यासाठी वृक्षरोपणाची चळवळ सुरू व्हावी, असे प्रतिपादन ग्रिन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व माजी आ. अनिल सोले यांनी केले.
स्थानिक नरसाई माता मंदिर परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे ग्रापं व ग्रिन अर्थ ऑर्गनायझेशनच्या संयुक्त वतीने आयोजित महावृक्षारोपणचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिप सदस्य जयश्री गफाट होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जगदीश संचेरीया, पंस सदस्य वंदना बावणे, उपसरपंच दिलीप रघटाटे, योगेश बन, भोलाजी सहारे, आशिष वांदीले, सुनील गफाट आदी उपस्थित होते.
सोले पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रिन अर्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने विदर्भात वृक्षदिंडी काढण्यात येऊन वृक्षारोपनाचे आवाहन करण्यात येते. आपण दोन वर्षांपूर्वी याच परिसरातील कार्यक्रमात वृक्षरोपनात वाढ न केल्यास भविष्यात आपल्याला प्राणवायूच्या नळकांड्या घेऊन फिरावे लागेल. त्याचे उत्तर याच वर्षी आपल्या कोरोना काळात मिळाले. प्राणवायूसाठी मारामार होती, असे त्यांनी सांगून गफाट यांनी सुरू केलेल्या चळवळीचे कौतुक केले.
मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण व संवर्धन करण्यार्या उडान महिला मंडळ, स्मशानभूमीत वृक्षारोपण व संवर्धन बद्दल प्रेरणा फाऊंडेशनचे सदस्य, मुस्लिम कब्रस्थानमध्ये वृक्षारोपण व संर्वधन करण्याबाबत व ग्रापंला रुग्णवाहिका दिल्याबद्दल मानवता बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष रफीक शेख, ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्ष लागवड व संवर्धन करणारे रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या रोजगार, उत्कृष्ट कामगिरी बद्दल ग्रामविकास अधिकारी हिरालाल राठोड यांचा तर दहावीत प्रथम येणारा शुभम दिलीप हेडाऊ, द्वितीय येणारी कोमल प्रभाकर वंजारी यांचा तर बारावीत प्रथम येणारी प्रिती देवराव पेठकर, द्वितीय येणारा योगेश रमेश वांदीले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.