पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून भारतात पाठवले स्फोटके

चंडीगढ : ९ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पंजाबमधून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. अमृतसरच्या ग्रामीण भागात हँड ग्रेनेड आणि टिफीन बॉम्ब आढळून आले आहेत. पंजाब पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला आहे. हे बॉम्ब पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून भारतात पाठवले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घातपाताच्या शक्यता पाहाता स्वातंत्र्यदिनाच्या आधी सर्व यंत्रणा अलर्टवर गेल्या आहेत.
पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतसरच्या ग्रामीण भागात हे बॉम्ब आढळून आले आहेत. यामध्ये हँड ग्रेनेड, टिफीन बॉम्ब आणि काही काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या डब्यात आईडी ठेवून हा टिफीन बॉम्ब तयार करण्यात आला होता. ही सर्व स्फोटकं पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहेत. यामध्ये ५ हँड ग्रेनेड, १००९ एमएम काडतुस आणि टिफीन बॉक्सचा समावेश आहे. ही स्फोटकं एका बॅगेतून भारतात पाठवण्यात आली. पाकिस्तानी सीमेजवळच्या एका गावातून ही स्फोटकं ताब्यात घेण्यात आली आहेत.
पाकिस्तानातून पाठवण्यात आलेली ही स्फोटकं पंजाबमधल्या गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणार होती अशी माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्रीही स्फोटकांच्या निशाण्यावर असू शकत होते असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला. 2 किलो आरडीएक्स चा स्फोट झाला असता तर त्यामुळे मोठं नुकसान झालं असतं. पण पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली.

Leave a Reply