स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय – हसन मुश्रिफांचा चंद्रकांत पाटलांना टोला

कोल्हापूर : ७ ऑगस्ट – स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय; अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही खोचक टीका केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील बोलतात हे आक्षेपार्ह आहे. पाटील यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. अन् पवारांना माढामधून मागे घालवल्याचे बोलतात. येत्या काळात असं बोलणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देतानाच स्वत:चं गाव राखता आलं नाही आणि संजय राऊत यांना कशाला आव्हान देता?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.
चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट झाली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट फिक्स होती का माहीत नाही. पण राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तरुण नाराज झाले आहेत, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत भाष्य केलं आहे. लोकल सुरू होणार आहे. त्याच श्रेय घेण्यासाठी ओढाओढ सुरू झाली आहे, असा चिमटा त्यांनी काढला. आरोपींनी केलेल्या आरोपावर अनिल देशमुख यांची चौकशी होणं दुर्दैवी आहे, असंही त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.
शिवसेना कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आदित्य ठाकरे भाग सोबर मुलगा आहे. वेगळ्या कल्पना घेऊन ते मंत्रिमंडळात काम करत आहेत, अशा शब्दात मुश्रीफ यांनी आदित्य यांचं कौतुक केलं.

Leave a Reply