फडणवीसांनी फेटाळली प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता

पुणे : ७ ऑगस्ट – भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं जाण्याची चर्चा आहे. पुणे दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्पष्ट शब्दांत ही चर्चा फेटाळून लावली आहे.
पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीनं भाजप तयारीला लागला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी मनसेसोबत युतीचीही चाचपणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये देखील बदलांची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्लीला जाऊन परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठकही झाल्याचंही बोललं जात आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील व आशिष शेलार हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या दौऱ्यामुळं पडद्यामागे काही तरी घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांच्या गच्छंतीचीही चर्चा आहे. फडणवीस यांनी आज याबाबत सविस्तर खुलासा केला.
‘केंद्रीय मंत्रिमंडळाचा अलीकडंच विस्तार झाला आहे. अनेक नवे मंत्री आले आहेत. त्यांच्या भेटीगाठी घेऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही दिल्लीत गेलो होतो. त्यामागे इतर कुठलंही कारण नाही. पक्षात कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तर अजिबात चर्चा नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आमचे हायकमांडही त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं कंड्या पिकवू नका. पतंगबाजी करू नका. चुकीच्या बातम्या देऊ नका. बातमी कमी पडली तर माझ्याकडं मागा,’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply