आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य एमपीएससी आयोगावर नेमावे – बबनराव तायवाडे

नागपूर : ७ ऑगस्ट – एमपीएससी आयोगावर नेमण्यात आलेले नवनिर्वाचित तीनही सदस्य हे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आहेत, असा आरोप करत आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य पॅनेलवर घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तर त्यांच्या विधानाशी सहमती दर्शवत एमपीएससी आयोग सर्वसमावेशक असला पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे, असं मोठं वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलवरील काही जागा रिक्त होत्या. त्या जागांवर राज्य सरकारने नियुक्त्या केल्या आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे सदस्य शासनाने पॅनेलवर घेतले आहेत, असा आरोप बबनराव तायवाडे यांनी केला आहे. एमपीएससी पॅनेलवर विदर्भातील ओबीसी सदस्य घ्या, केवळ पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नकोत, असं त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलमधील तिन्ही सदस्य मराठा समाजाचे आहेत. म्हणजेच आताचे तीन आणि आधीचे दोन सदस्य मराठा आहेत, ते ही पश्चिम महाराष्ट्रातील…. आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य पॅनेलवर घ्यावेत, असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. तसंच ओबीसी सदस्य न घेतल्यास त्यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगाचं इम्पेरीकल डाटा गोळा करण्याचं काम सुरु झालंय, अशी माहितीही बबनराव तायवाडे यांनी यावेळी दिली. एकंदरितच एमपीएससी आयोग हा सर्वसमावेश असला पाहिजे, असंच बबनराव तायवाडे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
दुसरीकडे एमपीएससी आयोग सर्व समावेश असला पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे, असं मोठं वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. एकूणच राज्य सरकारने एमपीएससी पॅनेलवर केलेल्या सदस्यांच्या नियुक्ती ओबीसी नेत्यांना खटकलेली आहे. याचप्रश्नावर ते आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांनी आंदोलनाचा इशाराच दिलाय.

Leave a Reply