राहुल गांधींसोबतच्या ‘फोटो’वर संजय राऊत म्हणाले, हातातला हात खांद्यावर आला!

नवी दिल्ली : ४ ऑगस्ट – दिल्लीच्या कन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या ‘नाश्ता बैठकी’त १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. पेगॅसस, शेती कायदे, इंधन दरवाढ अशा लोकांशी संबंधित मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, असं आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केलं. या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊतदेखील सहभागी झाले होते. बैठकीत राहुल गांधींच्या शेजारी बसलेल्या संजय राऊत यांचा एक फोटो नंतर समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला. या फोटोत राहुल गांधी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. दरम्यान, दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या फोटोवर भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांना या व्हायरल फोटोसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, सध्या आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य, सरकार चालवताना फक्त पक्ष नाही तर मनंही जवळ यावी लागतात. त्यादृष्टीने काही पावलं पडत असतील तर लोक स्वागत करतील.
दरम्यान, बैठकीत शेजारची जागा दिल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात आणि देशाच्या राजकारणात शिवसेनेला नेहमीच मानाचं स्थान मिळालं आहे. राहुल गांधी आणि माझी सातत्याने चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंचे काही निरोपही मी त्यांना दिले आहेत. महाविकास आघाडीबाबत तेदेखील समाधानी आहेत. सरकार एकत्रितपणे चालत असल्याचा त्यांना आनंद आहे.

Leave a Reply