मध्यप्रदेशात पूरस्थिती नियंत्रणाबाहेर, २२ गावे पाण्याखाली

भोपाळ : ४ ऑगस्ट – मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं ग्वालियर-चंबल भागात हाहाकार उडवून दिलाय. या भागातील जवळपास ११७७ गावांना या पुराचा फटका बसलाय. नागरिकांची आणि प्राण्यांची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. शिवपुरी आणि श्योपूर जिल्ह्यात ही परिस्थिती आणखीनच बिकट झालीय.
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. इथल्या जवळपास २०० गावांना पुरानं मोडीत जवळपास काढलंय तर २२ गावं पाण्याखाली आहेत.
प्रशासनाचे परिस्थितीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांचे प्रयत्न सुरू असतानाच आता भारतीय लष्करालाही पाचारण करण्यात आलंय.
आमचे दोन मंत्री शिवपुरीमध्ये कंट्रोल रुम बनवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय लष्कराच्या चार कॉलमची मागणी आहे. एका कॉलममध्ये लष्कराचे ८० जवान सहभागी असतात. लष्कर पाठवणं योग्य राहील, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय.
शिवपुरी जिल्ह्यात गेल्या काही तासांत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय. २६ जुलै २००५ रोजी मुंबईला पावसानं दणका दिला होता तेव्हा ९४४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल.
मध्य प्रदेशच्या ग्वालियर – चंबल भागात एनडीआरएफच्या तीन टीम रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाल्या आहेत. लखनऊ आणि बनारसहून एक-एक एनडीआरएफ टीम मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्या आहेत. शिवपुरी, श्योपुर, दतिया, ग्वालियर या ठिकाणी बचावकार्यासाठी लष्कराचे चार कॉलम कार्यरत आहेत. शिवपुरी जिल्ह्यात एसडीआरएफच्या सात टीम तैनात आहेत. वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी २४ तासांत जवळपास १६०० नागरिकांना रेस्क्यू केल्याची माहिती मिळतेय.

Leave a Reply