फ्रेंडशिप डेला झालेल्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या

नागपुर : ४ ऑगस्ट – शहरात हत्येचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीय. फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या वादातून नागपुरात २१ वर्षीय अनिकेत भोतमांगे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या भांडणानंतर काल रात्री नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात त्याच्याच मित्रांनी अनिकेतची हत्या केली. मृतक अनिकेत हा विंडो फ्रेमिंगचे काम करायचा. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मित्रच आपल्या मित्राची हत्या कशी करु शकतो? असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जातोय.
मृतक अनिकेतच्या वडिलांना त्याच्या मित्रांनी काल रात्री (3 ऑगस्ट) फोन करुन याबाबत माहिती दिली. अनिकेतला दुखापत झाली असल्यामुळे त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्याच्या मित्रांनी वडिलांना दिली. त्यानंतर अनिकेतचे वडील मेयो रुग्णालयात गेले असता त्यांना अनिकेतची हत्या झाल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे अनेकेतच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी रुग्णालयातच टाहो फोडला. या घटनेमुळे अनिकेतच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सहा जण दोषी आहेत. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. डीसीपी अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात नंदनवन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply