पार्टीत बोलावून मित्रांनीच केला मित्राचा खून

भंडारा : ४ ऑगस्ट – आठवडाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी जेवनाच्या पार्टीत बोलावून मित्रांनीच मित्राचा खून करून त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना तुमसर तालुक्यातील बघेडा येथे सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी एका मित्राला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. अभिनय नंदकिशोर माने (२३) रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बघेडा येथील कुलदिप डोंगरे याने रात्री घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये कुलदिपचे नागपूर येथील चार मित्र आले होते. पार्टीत सहभागी होण्यासाठी कुलदिपने अभिनयलाही बोलावले होते. त्यानुसार अभिनय हा आपले तुमसरातील दोन मित्र कैलाश साठवणे आणि बंटी यांच्यासोबत दुचाकीने बघेडा येथे गेला होता. दरम्यान, पार्टी सुरू असताना आठ दिवसांपुर्वी आंबागड येथे मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचा मुद्दा निघाला. त्यातून अभिनय याच्यासोबत कुलदिप आणि नागपूरच्या मित्रांसोबत वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. वाद अधिकच चिघळत असल्याने अभिनयचे दोन मित्र कैलाश आणि बंटी यांनी बघेडा येथून पळ काढला. इकडे, अभिनय रात्रभर घरी न आल्याने कैलाश आणि बंटी यांनी गोबरवाही आणि तुमसर पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच अभिनयचा खून झाला असावा, अशी शंका उपस्थित केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ शोधकार्याला सुरुवात केली.
अभिनयचा शोध सुरू असताना सकाळी बघेडा येथील नाल्यामध्ये अभिनयचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आरोपींनी अभिनयचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून टाकला असावा, असा संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांनी बघेडा येथील कुलदिप डोंगरे याला ताब्यात घेतले आहे. तर कुलदिपचे नागपूर येथील मित्र फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी अभिनयचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याप्रकरणी अधिक तपास गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील करीत आहेत.

Leave a Reply