पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान

मुंबई : ४ ऑगस्ट -‘स्वतंत्र भारताच्या आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात देखील पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत, हा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा प्रसंग आहे’ असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केले आहे. 9 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत “सागरी सुरक्षा” ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चासत्राचे अध्यक्ष आहेत. १९४५ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान हे सुरक्षा परिषेदच्या चर्चसत्राचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
‘भारतासाठी हा मोठा जागतिक सन्मान असून यातून भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे दर्शन होते तसेच भारत गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे; त्यादृष्टीने देखील हे महत्वाचे पाऊल आहे’ असंही भांडारी म्हणाले. गेल्या दोन वर्षात सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व, विश्व आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद, जी ७ राष्ट्रांच्या बैठकीचे निमंत्रण, क्वाड या संघटनेत महत्वाचे स्थान आणि आता सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद असे मोठे जागतिक सन्मान भारताला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मिळाले आहेत. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत सारा देश असताना हा बहुमान भारताला मिळणे ह्याला सांकेतिक महत्व आहे, असंही भांडारी म्हणाले.
ही परिषद ‘सागरी सुरक्षा’ ह्या विषयावर आयोजित केलेली आहे. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन ह्या बड्या देशांबरोबर अन्य १० सदस्य देश ह्या परिषदेत सहभागी आहेत. ‘ह्या परिषदेत चीनच्या उपस्थितीत ‘सागरी सुरक्षा’ ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चा घडवून आणणे हे भारतासाठी मोठे यश आहे’ असं भांडारी यांनी नमूद केलं.
भांडारी म्हणाले की, ‘चीनबरोबर आपला आणि जगातल्या बहुतेक देशांचा काही ना काही संघर्ष सुरु आहे. आपल्या सागरी सीमांची सुरक्षा व जागतिक पातळीवर भारतीय सागराची सुरक्षा हा त्यात कळीचा मुद्दा बनलेला आहे. केवळ भारतच नाहीतर अन्य अनेक देश ही चीनच्या सागरी आक्रमणाबद्दल सजग आहेत. असं असताना ह्या मुद्द्यावर जागतिक चर्चा घडवून आणून त्यावर काही जागतिक सहमत घडवण्याचा प्रयत्न भारत ह्या निमित्ताने करत आहे. ह्या सगळ्या घटनेला दूरगामी ऐतिहासिक महत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्व कौशल्याचा हा भाग देशाच्या दृष्टीने कमालीचा महत्वाचा असून आपल्यासाठी अभिमानाचा आहे, असंही भांडारी म्हणाले.

Leave a Reply