पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना फोन करून घेतली पश्चिम बंगालमधील पूरस्थितीची माहिती

नवी दिल्ली : ४ ऑगस्ट – गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील काही भागांत पूरस्थिती निर्माण झालीय. याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली.
या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना हरएक संभाव्य प्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलंय. पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आलीय.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरणांतून पाणी सोडल्यानंतर काही राज्यांत पूरस्थिती निर्माण झाल्यासंबंधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी त्यांना हरएक संभाव्य केंद्रीय मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे’ असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलंय. यावेळी पंतप्रधानांनी प्रभावित झालेल्या भागातील नागरिकांच्या सुरक्षेची आशाही व्यक्त केलीय.
भरघोस पावसानंतर दामोदर खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडल्यानंतर पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास २.५ लाख लोक विस्थापित झाल्याची माहिती मिळतेय. वेगानं आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अनेक घरंही उद्ध्वस्त झाली आहेत तसंच विजेच्या करंट लागल्यामुळे जवळपास १४ जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येतेय.

Leave a Reply