बर्फाळ डोंगरावरून पडल्याने चिखलीचा जवान सियाचीनमध्ये शहीद

बुलडाणा : ३ ऑगस्ट – सियाचीनमध्ये देशाच्या सीमेवर खडा पहारा देणारा बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील भारतीय सैन्य दलातील जवान कैलास भारत पवार एक वर्षाचा कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्याने आपल्या घरी परत येतांना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने खाली कोसळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला.
चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हा गेल्या 2 ऑगस्ट 2020 पासून 3-महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होता. त्याची सियाचीनमधील कर्तव्य 1 ऑगस्टला संपले होते. सहा महिन्यांच्या सुटीवर घरी येतांना आपल्या कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होता. दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलासचा पाय घसरला आणि तो बर्फावरुन खाली कोसळला. सोबत असलेल्या जवानांनी शक्य तेवढे लवकर त्याला तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान कैलास पवारची प्राणज्योत मालवली.
कैलास पवार कर्तव्यावर असतांना शहीद झाल्याची बातमी ऐकून घरातील मंडळी, नातलग आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत. दिवंगत जवान जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा आप्तपरिवार आहे. त्याच्या पार्थिवावर दि. 4 ऑगस्ट रोजी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी 11 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply