संपादकीय संवाद – कोणतेही विधान करतांना उद्धवपंतांनी वास्तवात डोकावणे गरजेचे

आम्ही एक थापड जरी मारली तरी तुम्ही खाली पडलं आणि पुन्हा उठणाराच नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे. यासाठी निमित्त झाले ते भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एका कार्यक्रमात शिवसेना भवनावर हल्ला करण्याची धमकी दिल्याचे. परिणामी आधी प्रसाद लाड यांच्या धमकीचे पडसाद उमटले आणि आता उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरही चर्चा सुरु आहे.
उद्धव ठाकरेंनी भाजपला एका झापडीत खाली पडण्याची वल्गना केली खरी, मात्र आजतागायत तरी त्यांना ते साधलेले नाही. उद्धव ठाकरेंसह समस्त शिवसेना प्रेमींचा दावा आहे की शिवसेनेच्या जोरावर भाजप वाढला मात्र इतिहासात डोकावल्यास शिवसेना कुठेच नव्हती त्यापूर्वीपासून भाजप अस्तित्वात आहे. तांत्रिकदृष्ट्या भाजपची स्थापना १९८० साली झाली असली तरी त्यापूर्वीही भाजप भारतीय जनसंघ या नावाने अस्तित्वात होताच. जनसंघाची स्थापना १९५२ सालीच झालेली आहे. शिवसेनेचा जन्म मात्र १९६६ साली झाला. शिवसेनेचा पहिला आमदार १९७० साली निवडून आला मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्राच्या विभिन्न भागात भारतीय जनसंघाचे लोकप्रतिनिधी सक्रिय होतेच. अगदी नाव घेऊन सांगायचे तर विदर्भात लक्ष्मणराव मानकर, महादेव शिवणकर ठाण्यात रामभाऊ म्हाळगी कोकणात डॉ. नातू खान्देशात उत्तमराव पाटील असे लोकप्रतिनिधी सक्रिय होते. भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली हे जरी ग्राह्य धरले तरी १९८० आणि १९८५ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार लक्षणीय संख्येत होते त्या तुलनेत शिवसेनेचे संख्याबळ नगण्य होते. १९८८ मध्ये शिवसेना भाजप युती झाली तोवर विदर्भात कुठेही शिवसेनेच्या शाखा नव्हत्या त्या काळात मुंबई, पुणे आणि कोकण वगळता कुठेही शिवसेनेचे अस्तित्व नव्हते. तरीही महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ असा हट्ट शिवसेना नेत्यांनी धरला आणि प्रमोद महाजनांनी तो मानला त्यामुळे शिवसेनेला भाजपच्या जोरावर मोठे केले गेले असे म्हणता येऊ शकते.
शिवसेना आणि भाजपची २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत युती होती. विधानसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर ही युती तुटली, खरे तर त्यावेळी शिवसेनेला भाजपला झापड मारून खाली पडण्याची नामी संधी होती. त्या निवडणुकीत दोन्ही पक्ष परस्पर विरोधात लढले. शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रात ताकद होती हे मानले तर सर्व जागा लढवून शिवसेना जेमतेम ६१ जागांवर विजयी होऊ शकली हे वास्तव पुरेसे बोलके आहे. त्या तुलनेत भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. हे बघता कुणी कुणाला झापड मारून खाली झोपवले हे स्पष्ट दिसते.
त्यानंतरही मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपला पाणी पाजण्याच्या वल्गना केल्या होत्या मात्र त्या वल्गनांचे काय झाले? हे स्पष्ट दिसतेच आहे. यावेळी शिवसेनेचे संख्याबळ तर कमी झालेच मात्र त्याचबरोबर महापालिकेची सत्ता टिकविण्यासाठी त्यांना पडद्याआडून भाजपची मदत घ्यावी लागली होती. शेवटी २०१९ मध्ये नाक मुठीत धरून भाजपशी युती करणे भाग पडले होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने काय केले? हा इतिहास ताजा आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी तत्वांशी तडजोड करून नव्हे तत्वांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंना अनैसर्गिक युती करावी लागली. तरीही अजून एका झापडीत झोपवून देण्याची भाषा उद्धवपंत करतात हा प्रकार काहीच विनोदीच वाटत नाही का?
राजकारणात पक्ष कार्यकर्त्याचे मनोबल वाढवण्यासाठी पक्षनेतृत्वाला अशी विधाने करावी लागतात हे जरी मान्य केले तरी अशी विधाने करतांना उद्धवपंतांनी वास्तवाचे भान ठेवावे इतकेच यावेळी सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply