मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल – चंद्रकांत पाटील

पुणे: २ ऑगस्ट- मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केलं आहे. राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत, तर खरं बोलतात. एक-दोन दिवसात माझी राज ठाकरेंशी भेट होणार आहे. माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असं सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
युतीबाबतचा मी एकटा निर्णय घेणार नाही. आमची पार्टी या संदर्भात निर्णय घेणार आहे. आता युती ऑन दी स्पॉट होणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं ते म्हणाले.मनसेचा परप्रांतीयांना होणारा विरोध ही युतीतील अडचण आहे. ही अडचण दूर झाली तर मी ओके देईन, असं त्यांनी थेट सांगितलं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. विशेष म्हणजे ही युती पालिका निवडणुकांसाठी राहणार नसून लोकसभा आणि विधानसभेतही राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात आणि राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीत नेमकं काय ठरतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Leave a Reply