दुकानांच्या वेळा ८पर्यंत वाढवणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : २ ऑगस्ट- कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज अध्यादेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रपरिषदेत बोलताना सांगितलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले., आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढवली आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक असून, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली.

Leave a Reply