कौटुंबिक कलहातून जावयाने केला सासूवर चाकूहल्ला

नागपूर : २ ऑगस्ट – कौटुंबीक कलहातून जावयाने भाऊ व नातेवाइकांच्या मदतीने चाकूने हल्ला करून सासूला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना जरीपटक्यातील हेमू कॉलनी येथे शनिवारी सकाळी घडली.
सरोज प्रताप खत्री (वय ४५) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी विशाल विनोद शर्मा, आकाश विनोद शर्मा व मीना विनोद शर्मा या तिघांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विशाल व लविशा यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघांमध्ये वाद व्हायला लागले. लविशा यांनी विशालला घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्यामुळे विशाल संतापला. शनिवारी सकाळी नातेवाइकांसह तो सासूकडे गेला व वाद घातला. तिघांनी सरोज यांच्यावर डोक्यावर, खांद्यावर चाकूने सपासप वार केले व पसार झाले. याप्रकरणी लविशाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कौटुंबिक कलहातून पतीने चाकूने वार करून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पाचपावलीतील बांगलादेश भागात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नंदिनी पुरुषोत्तम शाहू (वय २५) असे जखमीचे तर पुरुषोत्तम शाहू (वय ३१, रा. गरीब नवाजनगर) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. नंदिनी व पुरुषोत्तमध्ये सतत वाद व्हायचे. ती सासऱ्याकडे राहायला आली. शनिवारी पुरुषोत्तम तेथे आला. त्याने नंदिनीसोबत वाद घातला. चाकूने तिच्या पोटावर वार केले व पसार झाला. नंदिनीने पाचपावली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दुखापतीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply