आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या पूर्णत्वाची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकांची – राज्यपाल

अकोला : २ ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत, या संकल्पनेच्या पुर्णत्वाची जबाबदारी ही देशातील प्रत्येकाची आहे. आत्मनिर्भरता ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर ती आम्हा सर्वांची जबाबदारी आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. शंकरलाल उपाख्य काकाजी खंडेलवाल जन्मशताब्दी समापन कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख अतिथी म्हणून मुंबई स्थित राजभवनातून आभासी पध्दतीने बोलत होते.
शंकरलाल उपाख्य काकाजी खंडेलवाल जन्मशताब्दी समापन कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबई स्थित राजभवनातून आभासी पध्दतीने उपस्थिती होती. अकोल्यातील खंडेलवाल भवन येथे निमंत्रितांसाठीच्या आयोजित कार्यक्रमात मंचावर विदर्भ प्रांत सहसंघचालक चंद्रशेखर राठी, रामयणाचार्य संजय महाराज पाचपोर, जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष अतुल गणात्रा, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, आयोजन समितीचे सचिव महेंद्र कवीश्वर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, संसार हा परिवर्तनशील आहे. वंश आणि समाजाच्या उन्नतीसाठी तसेच जीवन सार्थक होण्यासाठी प्रत्येकाला त्याग करावा लागेल. काकाजी खंडेलवाल यांच्या चरित्रातून त्यांचे समर्पण,त्याग इतरांना प्रेरित करणारा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्योदयाच्या पूर्णत्वासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सर्वांनीच आपले योगदान घ्यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. आत्मनिर्भर भारताची निर्मिती करताना विविध क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. काकजींच्या जीवनातून आणि त्यांनी समाजातील विविध क्षेत्रात केलेल्या कामातून ते सतत समाजाच्या आत्मनिर्भरतेसाठी कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यांनी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply