शहराला ‘ग्रीन’ करण्‍याची जबाबदारी सर्वांचीच – नितीन गडकरी

नागपूर : १ ऑगस्‍ट – सीपेज वॉटर ट्रीटमेंट, ग्रीन बस, सीएनजी, एलएनजी असे विविध प्रकल्‍प पहिल्‍यांदा राबवून आ‍पण नागपूर शहराला ‘इको फ्रेंडली’ केले असून आता शहराला ध्‍वनीप्रदूषण मुक्‍त करण्‍याची जबाबदारी जनतेसह आपण सर्वांची आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केले.
ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनद्वारो दरवर्षी वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते. यावर्षी आयोजित महावृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते झाले. भारतीय विज्ञान संस्‍था, मिहान येथे झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी एम्‍सच्‍या संचालक डॉ. विभा दत्‍ता होते व विशेष उपस्थिती महापौर दयाशंकर तिवारी,खासदार विकास महात्‍मे, आमदार नागो गाणाार, आमदार परिणय फुके, सुभाष पारधी, गो गॅसचे चे नितीन खारा., ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, पदाधिकारी सुनील गफाट, सुभाष कासनगट्टीवार, भोलानाथ सहारे, रोटरी क्‍लबचे विवेक गर्गे, देवयानी शिरखेडकर, प्रकाश सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नितीन गडकरी व डॉ. विभा दत्‍ता यांच्‍या हस्‍ते लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्‍या प्रतिमांना माल्‍यार्पण केले. गडकरी व डॉ. दत्‍ता यांनी वृक्षारोपण करून महावृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्‍यवरांनी प्रत्‍येकी एका रोपटे लावण्‍यात आले.
ग्रीन अर्थ फाउंडेशनच्‍या कार्याचे कौतूक करताना नितीन गडकरी म्‍हणाले, प्रा. अनिल सोले यांनी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनाचे मोठे काम केले आहे. त्‍यांनी आता परिवहन क्षेत्राकडे लक्ष द्यावे आणि गाड्यांच्‍या हॉर्नच्‍या आवाजांवर नियंत्रण आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावे, जेणेकरून ध्‍वनी प्रदूषण कमी होईल.
नागो गाणार यांना उद्देशून नितीन गडकरी म्‍हणाले, जलशुद्धीकरण करून त्‍याचा पुनर्वापर करण्‍यासंदर्भात तीन ते चार प्रकल्‍प सुरू असून गाणार यांनी शाळांतील विद्यार्थी व‍ शिक्षकांमध्‍ये त्‍याबद्दल जनजागृती करावी. शाळा महाविद्यालयांच्‍या मैदानांमध्‍ये व इतर वापरासाठी या पाण्‍याचा वापर करण्‍याची मोहिम हाती घ्‍यावी.
विकासकामांना ज्‍या संस्‍था पर्यावरणाचे कारण समोर करून विरोध करतात त्‍यांनी केवळ विरोधाला विरोध करू नये तर विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालणारे प्रकल्‍प राबवावे, असे आवाहन करताना नितीन गडकरी यांनी पर्यावरण रक्षणासाठी जनतेने पुढे यावे असेही आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले. त्‍यांनी यावेळी ग्रीन अर्थच्‍यावतीने मागील सात वर्षांपासून राबविण्‍यात आलेल्‍या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. वृक्षदिंडीच्‍या माध्‍यमातून पूर्व विदर्भात आजपर्यंत जी झाडे लावण्‍यात त्‍यांचे संवर्धन करण्‍यात येत असून आगामी काळात पन्नास हजार झाडे लावण्‍यात येतील असा संकल्‍प त्‍यांनी यावेळी केला. ज्‍या भागात झाडे लावण्‍यात येतील, त्‍यांना जिओ टॅगी करणार असल्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन योगेश बंग यांनी केले तर आभार छोटू वांदिले यांनी मानले.

Leave a Reply