महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर सॅल्युट करतात तेव्हा…

अमरावती : १ ऑगस्ट – पोलिस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकार्‍यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो. मात्र, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किन्हाके यांना सॅल्युट करत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मारुतीराव किन्हाके १९८९साली पोलिस दलात रुजू झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. त्यांच्या ताफ्यातील पोलिसवाहनाचा चालक म्हणून ते सारथ्य करीत असतात. मारुती हे शनिवारी सेवानिवृत्त झाले. त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी सॅल्युट करत त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यशोमती ठाकूर यांनी त्यांच औक्षण करून तसेच शाल, श्रीफळ देऊन गौरव केला. तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुती किन्हाके यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply