बाबुल सुप्रियो यांनी घेतला राजकारणातून सन्यास

नवी दिल्ली : १ ऑगस्ट – आपण राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच खासदारकीचा राजीनामा देणार आहोत, असे माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान गमवावे लागल्यामुळे आणि राज्य भाजप नेतृत्वाशी असलेल्या मतभेदांमुळे हा निर्णय घेत असल्याचे संकेत त्यांनी दिले.
२०१४ सालापासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये निरनिराळ्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहणारे सुप्रियो यांना अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या मोठ्या फेरबदलात वगळण्यात आले होते.
‘‘आईवडील, पत्नी, मित्र यांचा सल्ला घेतल्यानंतर मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस किंवा माकप या कुठल्याही पक्षात जात नाहीये. मला कुणीही बोलावलेले नाही. मी एका संघातील खेळाडू आहे. मी नेहमी मोहन बगान या एकाच संघाला पाठिंबा दिला आहे आणि नेहमी एकाच पक्षात राहिलो आहे- तो म्हणजे पश्चिम बंगाल भाजप. आता मी तो सोडत आहे,’’ असे सुप्रियो यांनी फेसबुकवर सांगितले.
ते दोन वेळा आसनसोलचे खासदार राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते तृणमूलचे अरूप विश्वास यांच्याकडून पराभूत झाले होते.

Leave a Reply