एल्गारप्रकरणातील आरोपीला तात्पुरता जामीन

मुंबई : ३१ जुलै – मुंबई उच्च न्यायालयाने एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग याला तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या आईकरिता विधी पार पाडण्यासाठी न्यायालयाने गडलिंगला हा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबईतील तळोजा तुरुंंगात असलेल्या सुरेंद्र गडलिंगला कनिष्ठ न्यायालयाने ऑगस्ट २०२०मध्ये जामीन नाकारला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईच्या अन्त्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी त्याने जामीन अर्ज केला होता. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. याविरुद्ध सुरेंद्र गडलिंगने वरिष्ठ वकील सत्यनारायण आणि इंदिरा जयसिंह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागगितली होती. गडलिंग यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य एकतर रुग्णालयात दाखल झाले आहेत, असे गेल्या आठवड्यात त्याच्या वकिलाने उच्च न्यायालयात सांगितले होते. दरम्यान, सुरेंद्र गडलिंगने आपले पारपत्र राष्ट्रीय तपास संस्थेच्या सुपूर्द करावे तसेच जामीन कालावधीतील आपला संपूर्ण कार्यक्रम तपास संस्थेला सादर करावा, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला.

Leave a Reply