पंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरींनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : ३० जुलै – एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय गाठीभेटीने चर्चेला उधाण आलेलं असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरींची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच गडकरी पवारांना भेटल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे राजधानी दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक आहेत. त्यामुळे संसदेचं कामकाजात व्यत्यय येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट झाल्याचं वृत्त आहे. पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली. शिवाय मोदींच्या सांगण्यावरून ही भेट झाल्याचं सांगण्यात येतं, त्यामुळे गडकरी मोदींचा कोणता निरोप घेऊन पवारांना भेटले याविषयीचेही तर्क लढवले जात आहेत.
पेगासस प्रकरणावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून त्यामुळे संसदेचं कामकाज होताना दिसत नाहीये. पेगाससवर संसदेत चर्चा व्हावी आणि पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी त्यावर उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे संसदेतील ही कोंडी फोडण्यासाठीच गडकरी यांनी पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं. या भेटीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्प आणि पूरस्थितीवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.
शरद पवार आणि नितीन गडकरी हे जेव्हा एखाद्या नेत्यांच्या भेटी घेतात. तेव्हा ते फोटो ट्विट करतात. भेटीचं कारणही सांगतात. पण या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार आणि गडकरींची विकास कामांच्या निमित्ताने नेहमी भेट होत असते. ही राजकीय भेट असण्याची शक्यता कमी आहे, असं भुजबळ म्हणाले.

Leave a Reply