संपादकीय संवाद – महाआघाडीची कथित बदनामी आणि एसटी कर्मचार्‍याचे निलंबन

एसटी महामंडळात वाहक म्हणून नोकरी करणार्‍या प्रवीण लढी नामक कर्मचार्‍याला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आल्याची बातमी वृत्तपत्रांत आली आहे. प्रवीण लढीने महाआघाडी सरकारवर टीकात्मक पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित केली आणि त्यायोगे महाआघाडी सरकारची बदनामी केली, असा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणामुळे एरवीच मानसिक दबावात असलेले एसटी कर्मचारी अधिकच तणावात आले असल्याचे बोलले जात आहे.
प्रवीणने समाज माध्यमांवर नेमका काय संदेश दिला, हादेखील सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. महाराष्ट्राच्या महावसुली खंडणीखोर टोळीला अंबानींच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला, मात्र, ऑक्सीजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही, असे हे १०० कोटींचे वसुली सरकार आहे, असा हा संदेश वृतपत्रांनीदेखील प्रसिद्ध केला आहे, मात्र, हा संदेश निलंबन करण्याइतपत गंभीर आहे काय? हा प्रश्‍न सध्या विचारला जातो आहे.
आपल्या देशात राजकीय विरोधकांवर प्रसंगी पातळी सोडूनही टीका करण्याचा प्रकार फारसा नवीन नाही. अनिल परब ज्या शिवसेना पक्षाचे मंत्री आहेत, त्या शिवसेना पक्षाने तर, अनेकदा पातळी सोडून विरोधकांवर टीका केली आहे. ज्या शरद पवारांना आज उद्धव ठाकरे डोक्यावर बसवून नाचत आहेत, त्याच शरद पवारांना उद्धव ठाकरेंचे पिताश्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत ‘बारामतीचा ममद्या’, ‘मैद्याचे पोते’, अशी शेलकी विशेषणे बहाल केली होती. २०१४ आणि २०१७च्या निवडणुकांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांवर अनेकदा पातळी सोडून टीका केल्याचे पुरावे सापडतील.
शिवसेनाच काय, पण इतर पक्षातील नेत्यांनी आणि प्रसंगी जनसामान्यांनी राजकीय नेत्यांवर अनेक वेळा पातळी सोडत टीका केल्याचे दाखले सापडतील. माजी मुख्यमंत्री आणि आजचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर टीकेचा कहर झाला होता. आजही समाज माध्यमांवर त्यांचा उल्लेख अनेकदा ‘टरबुज्या’, असा केला जातो. त्या काळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे कायम फडणवीसांचा उल्लेख भर सभागृहात ‘फसवणीस’, असा करायचे. फडणवीसांच्या सुविद्य पत्नी अमृता यांच्यावरुनही अनेकदा टीका केल्या गेल्या. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान, कुणीतरी एका वक्त्याने आम्ही फक्त आरक्षण मागतो आहे, तुझी बायको मागत नाही, अशीही मुक्ताफळे उधळल्याचे वृत्त होते. अशा अनेक प्रकारच्या टीका अनेक नेत्यांवर झाल्या, मात्र, फडणवीसांच्या सुविद्य पत्नीचा पातळी सोडून उल्लेख करणार्‍यांवर कधी कारवाई केल्याचे पुरावे आढळत नाहीत. अशावेळी अनिल परबांनाच एकदम इतका जोर कां यावा, हा प्रश्‍न महाराष्ट्रातील जनतेला भेडसावतो आहे, मात्र, हा प्रश्‍न फक्त अनिल परबांचा नाही. एकूणच शिवसैनिकांच्या मानसिकतेचा आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करणार्‍यांना शोधून त्यांना घरी जाऊन मारहाण करण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेतल्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत. एकूणच आम्ही कोणाहीवर कशीही टीका करू, मात्र, आमच्यावर थोडे जरी कोणी बोलले, तरी आम्ही ऐकणार नाही, ही मुजोरी या प्रकारात दिसून येते. त्यातही शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे ही मुजोरी अधिकच वाढते आहे, असेही सध्या जनसामान्यांना जाणवते आहे.
आज तुमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही जनसामान्यांना कसेही वेठीला धरू शकता. जनसामान्य एकदम रस्त्यावर येत नाहीत, मात्र, ज्यावेळी अतिरेक होतो, त्यावेळी जनसामान्य खवळून उठतात. जर, रस्त्यावर येणे जमले नाही, तर संधी मिंळताच मतपेटीच्या माध्यमातून जनसामान्य हिसका दाखवतात. असा हिसका या देशात जनसामान्यांनी अनेकदा दाखवला आहे. १९९५मध्ये शिवसेनेची भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता आली. त्यानंतर साडेचार वर्षे शिवसैनिकांनी जे काही प्रकार केले, तेव्हापासून दर निवडणुकीत शिवसेनेचा जनाधार घटलेलाच बघायला मिळतो आहे. २०१४मध्ये स्वबळावर निवडणूक लढवूनसुद्धा शिवसेनेला जेमतेम ६३ जागा मिळवता आल्या होत्या. शिवसेनेने या सर्व मुद्यांची आठवण ठेवायला हवी. एवढेच सुचवावेसे वाटते. आज एका प्रवीण लढीला तुम्ही निलंबित केले. याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्‍यांपर्यंत एव्हाना पोहचलेही असेल. यातून धुमसणारी संतापाची आग हीच एक दिवस तुम्हाला भस्मसात करू शकेल, याची जाणीव ठेवायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply