जिल्हाधिकाऱ्यांना बघायला आलात की पाहणी करायला? अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

मुंबई : २९ जुलै – तुम्ही जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात, असा सवाल करीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज टोला लगावला.
मुसळधार पावसामुळे चिपळूण येथे पुराने थैमान घातले. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पाहणी केली. दरम्यान, यावेळी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी सर्वांसमोर आधी फोनवर आणि नंतर समोरासमोर अधिकाऱ्यांना झापलं. यावर आज अजित पवारांनी राणे यांचं नाव न घेता टीका केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाला पूरग्रस्त भागात जाण्याचा अधिकार आहे. पण, आपल्यासोबत अधिकारी असले पाहिजेत अशी अपेक्षा करु नये. जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता, तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असलं तरी असंच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद मधे आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली नाही.

Leave a Reply