गुमगाव परिसरात ३० वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून हत्या

नागपूर : २९ जुलै – हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुमगाव परिसरात एका ३0 वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुखदेव देवाजी विरखडे (वय ३0, रा. नवीन गुमगाव) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत सुखदेव सोमवार, २६ जुलैपासून घरून बेपत्ता होता. त्याचा भाऊ त्याला शोधत असताना बुधवारी (२८ जुलै) वागधरा-गुमगावच्या वेणा नदीवरील पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊसजवळ त्याचा मृतदेह आढळला. लागलीच याची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. मयताचे दोन्हीही हात दुपट्टय़ाने बांधले होते. शिवाय त्याच्या गळ्यालासुद्धा दुपट्टा गुंडाळला होता. तर त्याच दुपट्टय़ाचा अर्धा भाग वर रेलिंगला बांधला होता. सुखदेवला गळा आवळून मारल्यानंतर त्या इमारतीच्या रेलिंगला लटकवून आत्महत्या दर्शविण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी पथक बोलावण्यात आले. पोलिस उपायुक्त नरुल हसन, सहा पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते, हिंगण्याचे पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे यांनी घटनास्थळ तपासणीनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. हिंगणा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात मृतकाचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिचे लग्न ठरल्यानंतर तिच्या भावासोबत मयताचा चार-पाच दिवसांपूर्वी वाद झाला. यातच मुलीच्या भावाला बघून घेण्याची धमकी दिली होती. यातूनच ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना असून, दोन संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply