आजच्याच बैठकीत पुरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार – विजय वडेट्टीवार

मुंबई : २८ जुलै – पुरामुळे हाहा:कार उडून आठ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे सरकारी मदत कधी येईल याची पूरग्रस्तांना प्रतिक्षा आहे. मात्र, त्यांची ही प्रतिक्षा अवघ्या काही तासातच संपुष्टात येणार आहे. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा शंभर टक्के निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्याआधीच विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आज होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय होणार आहे. शंभर टक्के निर्णय होणार आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही अधिक मदत पूरग्रस्तांना दिली जाईल. या शिवाय छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही दिलासा दिला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
विरोधी पक्ष नेत्यांनी पूर पाहणी दौरा करणं गैर नाही. पण त्याचवेळी निलंबित आमदारांसह काहीजण जातात आणि अधिकारी नाही म्हणून काहीजण कांगावा करतात हे चुकीचं आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कॅबिनेट बैठकीआधीच मोठं विधान केलं आहे. ज्यांनी कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, असं शेख यांनी म्हटलं आहे. मॉल आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनाही दोन डोस घेतले असतील तर प्रवासाची मुभा दिली पाहिजे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारने दिलेली ७०० कोटींची मदत ही मागील वर्षीच्या पुराची आहे. पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईच्या पॅकेजबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे अशा कुटुंबांना तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Leave a Reply