राष्ट्रवादी ट्रस्ट करणार १६ हजार पूरग्रस्त कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचं वाटप

मुंबई : २७ जुलै – राज्याला पावसाचा फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे सांगताना शरद पवार यांनी पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार अशी माहिती दिली आहे. दरम्यान, एकूण १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना जीवनाश्यक वस्तूंचं वाटप केलं जाईल, असे ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूरग्रस्तांना भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय पथकं पाठवणार आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल. १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. चिपळूण, खेडमधील पाच हजार; रायगड महाडमधील पाच हजार, कोल्हापुरातील दोन हजार, सातारामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply