भारताने नेहमीच सतर्क असावे – माजी लष्करप्रमुख जनरल मलिक

नागपूर : २७ जुलै – पाकिस्तान ‘कारगिल-२’ होऊ देणार नाही. पण, भारताने नेहमीच सतर्क असले पाहिजे, या शब्दात माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी भारतीयांना सावधतेची जाणीव करून दिली. प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त माजी सेनाध्यक्ष जनरल वेदप्रकाश मलिक यांचे आभासी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जनरल मलिक म्हणाले की, कारगिल युद्ध आव्हान होतेच. निधीच्या कमतरतेमुळे शस्त्रे आणि उपकरणांची कमतरता होती. उपलब्ध संसाधनातून आम्ही दृढनिश्चयाने लढण्याचे ठरविले. त्या विजयाचे श्रेय जमिनीवरील सर्व सैन्य दलांना, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि समर्पण, विशेषत: तरुण अधिकारी आणि त्यांचे सेनापती यांना जाते. राजकीय नेते आणि सरकार यांनाही या विजयाचे श्रेय देणे आवश्यक आहे. आम्ही एक राष्ट्र म्हणून उभे राहिलो. अशा प्रसंगी समन्वय आवश्यक आहे, कारण हा संघर्ष करणारा एक संपूर्ण देश आहे.
यावेळी जनरल मलिक यांनी दिवंगत लेफ्टनंट कर्नल सुनील देशपांडे यांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. युवा पिढीतील देशभक्ती, शिस्त, धैर्य आणि जीवनाचे मूल्यमापन, समाजात लष्करी गुण विकसित करण्याचे महत्त्वाचे काम केल्याबद्दल त्यांनी प्रहार समाज जागृती संस्थेचे कौतुक केले.
प्रहार समाज जागृती संस्थेच्या अध्यक्षा शमा सुनील देशपांडे यांनी जनरल मलिक यांचे स्वागत केले. प्रारंभी प्रहार समाज जागृती संस्थेच्या संस्थापक सदस्या फ्लाईट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे यांनी दिवंगत कर्नल सुनील देशपांडे यांनी स्थापन केलेल्या प्रहार समाज जागृती संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

Leave a Reply