चितमपल्ली यांनी नवेगाव बांध सोडल्यानंतर सारस पक्ष्यांनी फिरवली पाठ!

नागपूर : २७ जुलै – अरण्यऋषी  मारुती चितमपल्ली येईस्तोवर सारसांची कित्येक संमेलने नवेगाव बांधच्या तलावाकाठी रंगली, पण ते येथून गेले आणि सारसांनीही पाठ फिरवली. सारसांच्या घरटय़ांपासून तर त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची धुरा सांभाळणारा मारुती चितमपल्लीसारखा अधिकारी वनखात्यात आता नाही, अशी खंत नवेगावबांध येथील माधवराव डोंगरवार पाटील यांचे वंशज दादासाहेब डोंगरवार पाटील यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्य़ात हा पक्षी शिल्लक आहे. ‘सेवा’ सारख्या संस्था संरक्षण व संवर्धनाचे कार्य करत आहेत, पण या पक्ष्याच्या अस्तित्वाला आता धोके  निर्माण झाले आहेत. नवेगावबांधमधून नाहीशा होत चाललेल्या सारस पक्ष्याची दखल आता न्यायालयाने देखील घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत याचिका दाखल करून घेतली आहे.
सहाय्यक वनसंरक्षक असताना चितमपल्ली यांनी नवेगावचे पक्षीवैभव आणि त्यांचा अधिवास जपला. रामपूरपासून तर गोठणगावपर्यंत प्रत्येक घरटय़ांतील पिले बाहेर पडेपर्यंत त्यांचे लक्ष राहात होते. त्यांच्यासोबत तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर जाधव यांनी खूप मेहनत घेतली. नामशेषाच्या मार्गावर असणारा हा पक्षी वाचवण्यासाठी धडपड केली. गोंदियात सर्वाधिक सारस त्याकाळात होते. ६० ते ६२  च्या संख्येत असलेल्या या पक्ष्यांची नवेगाव बांध तलावावर संमेलने भरत होती.  या संमेलनात सारस त्यांचा जोडीदार निवडत होते. चितमपल्ली यांनी  सारसांचा अधिवास जपण्यासाठी चराई बंदी केली. खस गवत काढण्यावर बंदी आणली. कमलकंद काढण्यावर बंदी आणली. आता त्याच गोष्टींवर कोटय़वधी रुपयांचा व्यापार सुरू आहे. खस गवत काढून विकले जाते. कमलकंद काढून विकले जातात. हे कमलकंद कल्याण, मुंबई, द्रुग, बैतुल, छिंदवाडा याठिकाणी  जातात. मात्र, या सर्व प्रकारावर वनखात्याचे नियंत्रण नाही. म्हणूनच सारसांचा अधिवास संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागली, असे दादासाहेब डोंगरवार पाटील म्हणाले.

Leave a Reply