नऊ वर्षांच्या चिमुकलीला २०० उठाबश्यांची अमानुष शिक्षा, शिक्षिकेवर गुन्हा दाखल

नागपूर : २४ जुलै – नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील महालगावच्या जिल्हा परिषद शाळेची ९ वर्षांची विद्यार्थिनी शिकवणी वर्गात उशिरा पोहोचली. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने तिला २०० उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली. शिक्षा तर मुलीने भोगली, पण त्यानंतर तिची प्रकृती चांगलीच ढासळली. हा चीड आणणारा प्रकार भिवापूर तालुक्यातील महालगाव येथे घडला.
मुलीच्या पालकांनी या प्रकाराची तक्रार पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बरेचदा वर्गात विद्यार्थी ऐकत नाहीत, शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना शिक्षा केली जाते. पण विद्यार्थ्यांचे वय, शारीरिक स्थिती बघूनही शिक्षा केली पाहिजे. शिक्षा जर जिवावर बेतत असेल, तर तो गुन्हा ठरतो. त्यामुळे आचल कोकाटे या शिक्षिकेच्या या कृत्यामुळे समाजमन संतापले आहे आणि तिलाही कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.
जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी गाथा कपिल मूल चौथ्या वर्गात शिकते. ऑनलाइन वर्गात मुलांना समजत नसल्याने महालगाव येथील शिक्षक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन सात शिक्षक मित्रांची नियुक्ती केली आणि त्यांना प्रतिशिक्षक दोन हजार रुपये मानधन देण्याचे ठरले. हे शिक्षक आपापल्या घरी वर्ग घ्यायचे. गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ग चारची जबाबदारी आंचल कोकाटे या शिक्षक मैत्रिणीवर होती. गाथा शिकवणी वर्गात उशिरा पोहोचल्याने कोकाटे हिने तिला तब्बल २०० उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली.

Leave a Reply