धोकादायक वस्त्यांच सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगड: २४ जुलै –ज्याला आक्रीत म्हणावं तसं घडतय, अनपेक्षित अशा दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो. त्यामध्ये देखील सगळी धावपळ होते आणि हे बघितल्यानंतर ज्या- ज्या वस्त्या धोकादायक आहेत. डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने केवळ विचार करणार नाही, तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकणी पुनर्वसन करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित होते. .
मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे.

Leave a Reply