संततधार पावसाने ऐतिहासिक किल्ल्याचे बुरुज ढासळले

चंद्रपूर : २३ जुलै – मागील तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याचे दोन प्रमुख बुरूज ढासळले आहेत. किल्ल्याच्या संरक्षक भिंतींना मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून तडे गेलेले आहेत. औद्योगिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बल्लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याची तातडीने दुरुस्ती करत सौंदर्यीकरण करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
बल्लारपूर शहरातील किल्ला हा बल्लारपूर शहराचे ऐतिहासिक वैभव आहे. या गोंडकालीन किल्ल्याच्या उत्तर-पूर्व दिशेला असलेला बुरूज तसेच पुरातन गोविंदबाबा मंदीरानजिकचा बुरूज पूर्णपणे ढासळला आहे. त्यामुळे बल्लारपूर शहराच्या या प्राचीन व ऐतिहासिक वैभवाचे तातडीने जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. बल्लारपूरातील हा किल्ला १३२० मध्ये आदिया बल्लारशाह या राजाने बांधला. बल्लारपूरातील अंतिम राजा खांडक्या बल्लारशाह यांनी या किल्ल्याच्या परकोटयाची पायाभरणी केली. मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार कायमच आहे. तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक किल्ल्याचे दोन प्रमुख बुरूज ढासळले आहेत. यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारचे पर्यटन व सांस्कृतीक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र पाठविले आहे.
गोंडकालीन वैभव असलेल्या या किल्ल्याची तातडीने दुरुस्ती करून किल्ल्याचे नव्याने सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने निधी उपलब्ध करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली आहे.

Leave a Reply