बालवयात नक्षली कारवाईत सामील झालेल्या रजुलाने दहावीच्या परीक्षेत यश मिळवून केला मुख्य प्रवाहात प्रवेश

गोंदिया : २३ जुलै – अगदी बालवयात नक्षली कारवाईत सामील झालेल्या मुलीनं आता मुख्य प्रवाहात येत दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून मोठं यश मिळवलं आहे. मुळची गडचिरोली येथील आदिवासी भागात राहणाऱ्या संबंधित मुलीनं तीन वर्षांपूर्वी बंदूक सोडून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. यानंतर तिचं भाग्य उजळलं आहे. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या मुलीला पोलिसांनी शिक्षणासाठी मदतीचा हात देत, शिक्षणासाठी तिला मोलाची मदत केली आहे. यामुळेच संबंधित मुलगी दहावी उत्तीर्ण होऊ शकली आहे. तिला दहावीला 51.80 टक्के गुण मिळाले आहे.
रजूला असं संबंधित मुलीचं नाव असून ती गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील लाव्हारी येथील रहिवासी आहे. तिने नक्षली कारवायांत भाग घेत, गडचिरोलीच्या कोरची-खोब्रेमेंदा-कुरखेडा (केकेडी) दलामध्ये काम केलं आहे. पण २०१८ साली रजूलानं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. यानंतर पोलिसांनी तिला पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं आहे. पोलिसांनी अगदी शाळेत दाखल करण्यापासून पुस्तकं-वह्या, दप्तर, गणवेश आणि सायकल देण्यापर्यंत शक्य ती सर्व मदत केली होती. त्यामुळे हा बदल घडला आहे.
वृत्तानुसार, रजुला अगदी लहान असतानाच, तिच्या डोक्यावरील वडिलाचं छत्र आलं होतं. तीन बहिण भावांपैकी रजूला ही सर्वात लहान होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं अगदी बालवयातच रजूला घरची जनावरं चारण्यासाठी जंगलात घेऊन जात असे. दरम्यान एकेदिवशी रजूला जंगलात जनावरं चारण्यासाठी गेली असता, ती नक्षलवाद्यांच्या संपर्कात आली. नक्षलवाद्यांनी तिच्याकडील मोबाइल फोन हिसकावून घेतला आणि वाट विचारण्याच्या बहाण्यानं तिला घेऊन गेले.
तिकडे घेऊन गेल्यानंतर, नक्षलवाद्यांनी अज्ञान रजुलाचं मत परिवर्तन केलं, तिला शस्त्रांव्यतिरिक्त वॉकी टॉकी आणि इतर उपकरणं वापरण्याचं प्रशिक्षण दिलं आणि नक्षलवादी कारवाईत सामील करून घेतलं आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी रजूलावर किमान अर्धा डजन गुन्हे दाखल होते. पण तिने २०१७ साली गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. २०१९ ते २०२१ दरम्यान तिने गोंदियात आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. परीक्षेत तिला मराठी भाषा आणि गणिताशी झगडावं लागलं. त्यामुळे नक्षल सेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिला ‘ट्यूशन शिक्षक’ म्हणून मदत केली. रजूला सध्या दहावी उत्तीर्ण झाली असून पोलीस दलात दाखल होण्याची तिची इच्छा आहे.

Leave a Reply