अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार

अकोला : २३ जुलै – अकोला जिल्हय़ात मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. मोर्णासह जिल्हय़ातील इतर प्रमुख नदी-नाल्यांना पूर आला. ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शहरातील नदीकाठच्या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. मध्यरात्रीपासूनच असंख्य नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्याचे कार्य सुरू आहे. नुकसानीचे १३ पथकाद्वारे पंचनामा करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
अकोला शहरासह जिल्हय़ात रात्रभर धो-धो पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे मोर्णा नदीला महापूर आला. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जुने शहरातील डाबकी मार्ग, शिवसेना वसाहत, बाळापूर नाका आदी भागांमध्ये घरात पाणी शिरले. घरांमध्ये कंबरे एवढे पाणी साचल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. खडकी, कौलखेड, सिंधी कॅम्प परिसरात मोर्णा नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. आ. रणधीर सावरकर यांनी रात्रीपासूनच बचाव कार्य सुरू केले. पुरात अडकलेल्या सुमारे ५० जणांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वीज पुरवठा खंडित झाल्याने बचावकार्याला अडचणी निर्माण झाल्या. पुरात अडकलेल्या नागरिकांना हलवण्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला. जवाहर नगर, मोठी उमरी, न्यू तापडिया नगर, गोकुळ कॉलनी, मुकुंद नगर आदी भागांनाही फटका बसला आहे. आ. गोवर्धन शर्मा यांनी शिवसेना वसाहत येथील पाच फूट पाण्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. किराणा बाजार, खोलेश्वर, कमला नेहरूनगर, गीतानगर, कैलास टेकडी, खेतान नगर आदी पुरग्रस्त भागाची पाहणी करून आ. शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधला. रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने पूरग्रस्तांसाठी चहा, पाणी, नास्ता व भोजनाची व्यवस्था केली.
दरम्यान, जिल्हय़ातील काटेपूर्णा नदीला देखील पूर आला आहे. पुरामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पुराचे पाणी नदीकाठावरील शेतात शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले. नदीकाठावरील गावातील शेत जमीन पाण्याखाली आली. जिल्हय़ातील अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काही गावाचा संपर्क देखील तुटला. जिल्हय़ात गेल्या २४ तासांत सरासरी ८०.६ मि.मी. पाऊस झाला असून अकोला तालुक्यात ११६.४ व बार्शीटाकळीमध्ये १६८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
सर्वोपचार रुग्णालयाततील काही वार्डात पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांचे चांगलेच हाल झाले. अतिदक्षता विभाग पूर्णत: जलमय झाला होता. पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. वॉर्ड क्रमांक सहा आणि सात मध्येही पावसाचे पाणी गुढघ्या एवढे शिरले होते. सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला.
जिल्हय़ातील विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाळा सुरू असल्याने नेरधामणा धरणाची सर्व द्वारे उचलून ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी पूर पातळी २४४.५० मी असून १२ द्वारातून पाणी वाहत आहे. पूर विसर्ग ५८४७.६६ ‘घमीप्रसें’ने सुरू आहे. दगडपारवा प्रकल्पाचे एक वक्रद्वार २.५० से.मी.ने उघडण्यात आले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील पातळी ३४४.८२ मी आहे. शहानूर प्रकल्पाचे दोन द्वार १० से.मी.ने उघडण्यात आले आहेत.
अकोट तालुक्यातील पनोरी येथील ४५ वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरामध्ये वाहून गेला असून त्यांचे शोध कार्य सुरू आहे. जिल्ह्यात २२३७ घरांचे नुकसान झाले असून ६२०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. १५३ जनावरांचे मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली. उगवा गावाच्या शेतात पुरामुळे अडकलेल्या दोन लोकांना एसडीआरएफ पथकाने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच पुरामुळे अडकलेल्या २४ लोकांना पथकाने बाहेर काढले.

Leave a Reply