ऑनलाईन शॉपिंग करताना झाली फसवणूक , ५०० रुपयाच्या थर्माससाठी गमावले ५ लाख रुपये

नागपूर : २२ जुलै – मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या एका लोको पायलटला ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून ५०० रुपयांना खरेदी केलेला थर्मास तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त महाग पडला आहे. विकत घेतलेला थर्मास पसंत पडला नाही. त्यामुळे विज्ञान प्यारेलाल मेश्राम यांनी तो थर्मास परत करण्यासाठी गुगलवरून कस्टमर केअर नंबरवरून संबंधीत शॉपिंग वेबसाईटशी संपर्क केला. त्यावेळी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या ते संपर्कात आले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी विज्ञान मेश्राम यांच्या खात्यातून तब्बल पाच लाखांपेक्षा जास्तची रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक केली. या संदर्भात विज्ञान मेश्राम यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
आपल्या देशात सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड अगदी जोरात सुरू आहे. लहानातली लहान वस्तू सुद्धा ऑनलाईन शॉपिंग साईटवरून विकत घेतली जाते. लॉकडाऊनच्या काळात तर हा ट्रेंड फारच वाढलेला दिसतोय. सारेच काही ऑनलाईन उपलब्ध होऊ लागले आहे. दुसरीकडे फसवणुकीच्याही घटना वाढल्या आहेत. असाच फटका नागपूरच्या कपिल नगरच्या शेंडे नगर येथे राहणारे रेल्वे लोको पायलट विज्ञान प्यारेलाल मेश्राम यांनाही बसला आहे.
विज्ञान मेश्राम यांनी एका ऑनलाईन साईटवरून एक थर्मास विकत घेतला. त्याचे पेमेंटसुद्धा ऑनलाईन पद्धतीने केले. निर्धारित वेळेत थर्मासची डिलिव्हरी सुद्धा झाली. मात्र, त्यांना तो थर्मास पसंत आला नाही. त्यामुळे विज्ञान मेश्राम यांनी थर्मास परत करण्यासाठी त्या कंपनीला रिक्वेस्ट पाठवली. कंपनीच्या माणसाने तो थर्मास परत घेऊन गेल्यानंतर काही दिवसांमध्ये पैसे परत मिळतील, असे सांगितले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने विज्ञान मेश्राम यांनी गुगलवरून त्या कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्या नंबरवरून विज्ञान यांनी आपली तक्रार सांगितली.
यादरम्यान विज्ञान सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आले. पैसे परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी विज्ञान मेश्राम यांच्याकडून बँकेची सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर क्षणात विज्ञान यांच्या बँक खात्यातून ५ लाख २५० रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विज्ञान यांनी कपिल नगर पोलीस ठाणे गाठले. तेथे जाऊन त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.
विज्ञान मेश्राम यांना सायबर गुन्हेगारांनी एरिडिक्स नावाचे एक अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. ते अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल होताच विज्ञान मेश्राम यांच्या मोबाईलचा अॅक्सेस आरोपींकडे गेला. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी विज्ञान मेश्राम यांच्या खात्यातून थोडे थोडके नव्हे तर तब्बल पाच लाख रुपये लंपास केले. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी कस्टमर केअरसोबत संपर्क करताना अशा प्रकारचे कोणतेही अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले तर ते करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply