संपादकीय संवाद – निमित्त मुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवत पंढरपूरला जाण्याचे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे काल पंढरपूरला जाताना स्वतः कार चालवत पंढरपूरला गेले या बातमीवरून समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात उद्धव ठाकरेंचे समर्थक त्यांचे कौतुक करत आहेत, तर विरोधक वेगवेगळ्या टीकाही करत आहेत.
टीका करतांना दोन महत्वपूर्ण प्रतिक्रिया बघण्यात आल्या आहेत, त्यातील एक प्रतिक्रिया अशी आहे की महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवा आहे ड्रायव्हर नको, तर दुसरी प्रतिक्रिया अशी आहे की बा विठ्ठला तू मुख्यमंत्र्यांना स्वतः कार चालवत आपल्या भेटीला बोलावले तसेच स्वतः कार चालवत का होईना पण दररोज मंत्रालयात येण्याची बुद्धी दे.
या दोन्ही प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मंत्रालयात फार कमी जातात अशी तक्रार आहे. सर्वकाही शासकीय कारभार ते मातोश्री बंगल्यावरूनच करतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी मलबारहिल येथील वर्षा हा बांगला हे अधिकृत निवासस्थान आहे मात्र शपथ घेऊन १९ महिने लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी वर्षावर मुक्काम हलविलेला नाही. वर्षाचा उपयोग ते फक्त बैठकी घेण्यासाठी करतात. कोरोना काळात तर मुख्यमंत्र्यांनी मातोश्री सोडून बाहेर कुठे फारश्या भेटी दिल्या नाहीत अशीही तक्रार केली जाते. त्यामुळेच जेव्हा मुख्यमंत्र्यांना देशातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून एका सर्वेक्षण गटाने गौरवले तेव्हा एकदाही घराबाहेर न निघणारा मुख्यमंत्री असूनही सर्वोत्कृष्ठ कसे ठरले असे सवालही समाजमाध्यमांवर विचारले गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर अशी टीका होणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री अधून मधून मुंबईतही स्वतः कार चालवतात, पंढरपूरला जातानाही त्यांनी स्वतः कार चालवली. त्यावरूनही टीका झाली आहे. मात्र कोणत्याही मुख्यमंत्र्याला राज्याचा गाडा हाकावाच लागतो त्या रथाचा मुख्यमंत्री हा सारथीच असतो ही बाब टीकाकारांनी लक्षात घ्यायला हवी.
मुख्यमंत्री स्वतः कार चालवत पंढरपूरला गेले याचे मुख्यमंत्री समर्थकांना खूप अप्रूप वाटते आहे मात्र उद्धव ठाकरे हे काही वाहन चालवणारे पहिलेच मुख्यमंत्री नाहीत, १९७८ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा ते खूपच तरुण होते. त्या काळात पूरग्रस्त भागाचा दौरा करतांना जिथे कार जात नाही तिथे जीपने जावे लागायचे, त्यावेळी शरद पवार स्वतः जीप चालवायला बसायचे. पवार मुख्यमंत्री असतानाच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे परदेशात निधन झाले, त्यांचा मृतदेह परदेशातून मुंबईला आला त्यानंतर शासकीय विमानाने अकोल्याला आणला गेला, अकोल्याहून जीपने यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या नाईकांच्या गावी नेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी अकोला विमानतळ ते गहुली हे जवळ जवळ २०० किलोमीटरचे अंतर स्वतः जीप चालवत कापले होते. पवारांसारखेच वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोघेही मुख्यमंत्री असताना अनेकदा जीप चालवायचे.
ही सर्व मंडळी निदान चारचाकी तरी चालवतात नागपूरकर असलेले केंद्रीय मंत्री नितीन जयराम गडकरी अजूनही दरवर्षी दिवाळीला खरेदी करायला त्यांच्या धर्मपत्नी कांचनवहिनींना स्कुटरवर डबलसीट घेऊन जातात. सुरुवातीला ही बातमी व्हायची मात्र आता नागपूरकरांनाही सवय झाली आहे.
त्यामुळे उद्धवपंतांनी कार चालवली तर त्यावर टीकाही नको आणि कौतुकही नको.

अविनाश पाठक

Leave a Reply