फोनवरून पाळत ठेवण्याचे आदेश कोणी दिले? अजित पवार

मुंबई: २१ जुलै- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर फोनवरून पाळत ठेवण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पेगॅसस या अँपच्या माध्यमातून ही हेरगिरी करण्यात आल्याचा दावा केला जात असून, या हेरगिरी प्रकरणावरून देशात प्रचंड गदारोळ उडाला आहे. या प्रकरणाचे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही तीव्र पडसाद उमटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणी देशाचा अधिकार आहे की बारकाईने या गोष्टी पुढं आणल्या पाहिजे असं म्हटलं आहे.
प्रत्येकाला त्यांची प्रायव्हसी मिळाली पाहिजे. एखाद्या व्यक्तीमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल किंवा देशद्रोही काम होत असेल याबाबत त्या त्या देशाचा अधिकार आहे की बारकाईने या गोष्टी पुढं आणल्या पाहिजेत. नियम आणि कायदे केले जातात आणि त्याचा आधार घेऊन निष्पाप लोकांना भरडलं जात असल्याच्या अशा अनेक घटना देशात पुढे आल्या आहेत. याबाब सत्ताधारी पक्षाचं वेगळं मत आहे तर विरोधी पक्षाची वेगळी भूमिका आहे. एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे. एकदम बातमी पुढं आली याचा अर्थ कुठं तरी पाणी मुरत आहे. देशातील सव्वाशे कोटी जनतेला नक्की काय झालं आहे? हे कोणाच्या काळात झाल आहे? कोण जबाबदार आहे? कोणी आदेश दिले आहेत? हे कळलं पाहिजे, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply