नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशनवर निघाला साप

नागपूर : २१ जुलै – रेल्वे स्टेशनवर नेहमी असणारी प्रवाश्यांची गर्दी आणि या गर्दीत अचानक फणा काढून साप उभा झाला तर…? विचार करूनच बोबडी वळेल. मात्र असाच काहीसा भीतीदायक प्रकार अजनी रेल्वे स्थानकावर काल रात्री घडला. मात्र, पोलिस शिपाई श्रीकांत उके यांनी लगेच सापाला पकडले. भीतीच्या सावटाखाली असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळताच गाडी पुढील प्रवासाला निघाली.
रात्री धो… धो… पाऊस कोसळत होता. ८.३० वाजताच्या सुमारास हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस धडधड करीत आली आणि अजनी स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर थांबली. खाद्य पदार्थ घेण्यासाठी प्रवासी उतरले. एस-११ डब्यातील प्रवाशीही खाली उतरले. तोच समोर ढुरक्या घोणस जातीचा सर्प प्रवाशांना दिसला. साप… साप… म्हणत प्रवाशांनी आरडाओरड केली. काही उत्सुकतेपोटी तर काही भीतीपोटी डब्याबाहेर पडले. सारेच घाबरले होते. डब्यात तर सर्प नाही ना? अशी शंका असल्याने डब्यातील सारेच प्रवासी बाहेर पडले आणि सुरक्षित स्थळी थांबले. मात्र, घोणस जागचा हलत नव्हता.
या घटनेची माहिती स्टेशन व्यवस्थापक माधून चौधरी यांना मिळाली. लगेच त्यांनी सर्प मित्र-अभ्यासक आणि पोलिस शिपाई श्रीकांत उके यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. या घटनेची माहिती दिली. श्रीकांत दहा मिनिटाच्या आत स्टेशनवर पोहोचला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घोणसला पकडून प्रवाशांना दिलासा दिला. तसेच डब्यात आणखी सर्प तर नाही याचीही खात्री करून घेतली. प्रवासी आश्वस्त झाल्यानंतर गाडी पुढील प्रवासाला निघाली, मात्र झाल्या प्रसंगाने तिचा थोडा खोळंबा झालाच.
श्रीकांत हा अजनी लोहमार्ग पोलिस अंतर्गत पोलिस शिपाई असला तरी तो सर्प मित्र आणि सर्प अभ्यासक आहे. त्याला सरपटणाऱ्या प्राण्यांचा चांगला अभ्यास आहे. पकडलेला साप ढुरक्या घोणस जातीचा असून, अजनी रेल्वे स्थानक परिसरात त्याचे वास्तव्य आहे. धो…धो…पावसामुळे तो फलाटावर आला असावा असा अंदाज त्याने व्यक्त केला. यापूर्वी श्रीकांतने नागपूर रेल्वे स्थानकावर कोबरा जातीचा साप पकडला आहे.
श्रीकांत उके यांनी आतापर्यंत स्टेशन परिसरात पाच ते सहा साप पकडले. सुरक्षेसह प्रवाशांना दिलासा देण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

Leave a Reply