हेरगिरीचे प्रकरण धक्कादायक, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यावर खुलासा केला पाहिजे – संजय राऊत

नवी दिल्ली : २० जुलै – केंद्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. त्यांचीही हेरगिरी करण्यात आली. विशेष म्हणजे ते मंत्री नसताना ही हेरगिरी केली. नंतर त्यांना मंत्रिपदे दिली. हे सर्वच धक्कादायक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावर खुलासा केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. दोन केंद्रीय मंत्र्यांवरही पाळत ठेवली. केंद्रातील नवे रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही हेरगिरी केली गेली. हे धक्कादायक आहे. त्यांच्यावर का पाळत ठेवली? कशासाठी पाळत ठेवली माहीत नाही. वैष्णव आधी मंत्री नव्हते. ते आता मंत्री झाले. मग त्यांच्यावर का पाळत ठेवली होती. याचा खुलासा झाला पाहिजे. विशेष म्हणजे ते याच खात्याचे मंत्री आहेत. आधी पाळत ठेवली. आता त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. हे का केलं? हे देशाला समजलं पाहिजे. हा गंभीर मुद्दा आहे, असं राऊत म्हणाले.
पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. त्यावरून या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे असं या देशातील नागरिकांना वाटतं. अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि इतर कोणी असतील त्या प्रत्येकावर पाळत ठेवली जात आहे. त्यांची हेरगिरी केली जात आहे. हे काल स्पष्ट झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
फोन टॅपिंग हा राजयीक मुद्दा आहे. तो प्रायव्हसीचाही मुद्दा आहे. सरकार फोन टॅपिंग का आणि कशासाठी करत आहे हे मला कळत नाही. आम्ही महाराष्ट्रात सरकार बनवत असताना आमचेही फोन टॅप करण्यात आले. उद्धव ठाकरेंपासून माझेही फोन टॅप केले. नाना पटोले यांचेही फोन टॅप झाले. सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत असलेल्या सर्वांचे फोन टॅप केले जात होते. आमचे फोन टॅप करण्यासाठी मोठमोठ्या एजन्सी कामाला लावल्या होत्या. तरीही आम्ही सरकार स्थापन केलं. बंगालमध्येही फोन टॅप केले. तरीही सरकार बनलं. आम्ही घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply