सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा – मोदींनी दिले पक्षातील खासदारांना निर्देश

नवी दिल्ली : २० जुलै – देशातील करोना स्थितीसंबंधी विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असून त्याला उत्तर द्या असा आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षातील खासदारांना दिला आहे. भाजपाच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी पक्षातील खासदारांना निर्देश देताना काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचं अस्तित्व संपत आलं तरी आमचीच चिंता असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, त्यांना वारंवार सत्य सांगा असा आग्रह यावेळी मोदींनी केला.
नकारात्मक वातावरण निर्माण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी यावेळी केला. काँग्रेसवर टीक करताना ते म्हणाले की, “आपण इथपर्यंत आलो आहोत आणि या कोमामधून ते अजून बाहेर आलेले नाहीत. काँग्रेसचे वागणं दुर्दैवी आहे. आपण इतक्या दूरपर्यंत आलेलो आहोत आणि लसींचा तुटवडादेखील नाही हे त्यांना पचलेलं नाही. दिल्लीतही २० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे”.
“काँग्रेसला आपल्या मतदारांची (जनआधार) चिंता नाही. आपण ६० वर्ष देशावर राज्य केलं हे अद्यापही त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यामुळेच जनतेने आपली निवड केल्याचं त्यांना पचत नाही आहे. पश्चिम बंगाल, आसाममध्ये पराभव झाल्यानंतरही विरोधक म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत नाही आहेत. त्यांनी जनहिताचे मुद्दे आक्रमकपणे मांडणे अपेक्षित असताना तसं होताना दिसत नाही,” असंही यावेळी मोदी म्हणाले.
काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्ष देशातील करोना स्थितीवरुन वारंवार मोदी सरकारवर टीका करत असून अपयशी ठरल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कऱण्यासाठी खासदारांना तायर राहण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांच्या मते ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये ही तिसरी लाट येणार आहे.

Leave a Reply