शरद पवार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : २० जुलै – भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार बोलतात, छगन भुजबळ मोर्चे काढतात मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काही बोलत नाही यातील कोणीतरी झारीतील शुक्राचार्य आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे म्हटलं, “छगन भुजबळ मोर्चे काढतात, छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा ,भाजप त्यांना नक्की मदत करणार. डेटात ६९ लाख चुका आहेत नव्यानं डेटा तयार करावा. शरद पवार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य आहेत. यांना डिसेंबर २०२२ पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचं नाहीये.”
फक्त ओबीसी आयोग त्यांनी तयार केला मात्र अजूनही कामकाज सुरू केलं नाही. यात केंद्राचा कोणताही संबंध येत नाही. हे राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातील डेटात ६९ लाख चुका आहेत. राज्यात, देशात ओबीसी नेत्यांना सगळ्यात जास्त भाजपानं प्रतिनिधित्व दिलं आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, ओबीसी आरक्षण १९९७ ला २७ टक्के आरक्षण मिळालं होतं. हे कायम होण्यासाठी कोर्टात दाखल केसच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी केस टाकली. आम्ही हायकोर्टात योग्य मांडणी केल्यानं कोर्टानं आमच्या बाजूनं निकाल दिला. याविरोधात काँग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले. ३१ जुलै २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण टिकवलं. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा अध्यादेश लॅप्स झाला.

Leave a Reply