दुचाकीला धडक मारून दुचाकीस्वाराचे १ लाख ७० हजार लुटले

वाशिम : २० जुलै – वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील शेलू खडसे मार्गावर दुचाकीला दुचाकीने जोरदार धडक मारून एक लाख ८० हजार रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या लुटमारीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमध्ये एक ७० वर्षीय वृद्ध महिला आणि एक व्यक्ती असे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून घरफोडी, मोटारसायकल चोरीसह विविध प्रकारच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढल्याने जिल्ह्यातील नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील बबनराव लक्ष्मण सानपयांनी त्यांच्या शेत जमिनीचे व्यवहार केले त्यांनतर ते आई आणि अपंग भाऊ यांना दुचाकीवर घेऊन रिसोड येथून आज दुपारी तीनच्या दरम्यान आपल्या गावाकडे जाण्याकरीता निघाले होते. त्यांच्याजवळ जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली २ लाख ७० हजार रुपयांची रक्कम सोबत होती. यातील एक लाख ८० हजार रुपयांची रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. तर उर्वरित ९० हजार रुपयांची रक्कम खिशात ठेवली होती.
हे तिघे दुचाकीने आपल्या बोरखेडी या गावाकडे शेलू खडसे मार्गाने जात असतांना रस्त्यात अचानक समोरून भरधाव दुचाकी आली आणि एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात अज्ञात दुचाकीवर तीन इसम बसलेले होते. दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्यानंतर दोन्ही दुचाकीवरील व्यक्ती रस्त्याच्या खाली पडले. त्यानंतर लगेच अज्ञात दुचाकीवरील दोघांनी बबनराव सानप यांच्या दुचाकीवरील डिकी फोडुन त्यामध्ये ठेवलेली एक लाख ८० हजार रुपयांची रक्कम घेऊन तेथून पळ काढला.
या घटनेत बबनराव सानप यांच्या आई प्रयागबाई सानप यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तर त्यांचे भाऊ माणिक सानप यांना ही किरकोळ मार लागला असून या दोघांवर औषधोपचार सुरू आहेत. दिवसा घडलेल्या या लुटमारीच्या घटनेमुळे रिसोड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थ भीती खाली वावरत आहेत. या लुटमारीच्या घटनेचा तपास रिसोड पोलीस करत असून गुन्हेगारांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलीस पथकं पाठविण्यात आले आहेत.

Leave a Reply