‘मिहान’मध्ये १६०० कोटी रुपयांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार – विजय वडेट्टीवार

नागपूर: १९ जुलै- पावसाचा अचूक अंदाज घेता यावा, अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा जनतेपर्यंत पोहोचवून नुकसान टाळता यावे आणि पीक नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मोबादला देता यावा, यासाठी इस्रायलच्या धर्तीवर मिहानमध्ये १० एकर जागेत १६०० कोटी रुपयांचे अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, यंदा १०२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु, मुंबई, कोकण वगळता इतर भागात पाऊस पडलेला नाही. भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात कमी पाऊस आहे. त्यामुळे त्या भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याचे अंदाज चुकत आहेत. त्यामुळे इस्रायलच्या धर्तीवर भारतातील सर्वात अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र मिहानमध्ये उभारण्यात येणार आहे. हे केंद्र येत्या ६ महिन्यात सुरू होणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, यावर १६०० कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागण्यात येईल. मध्य भारतासाठी हे केंद्र अत्यंत उपयोगी पडेल. हवामानाची अचूक माहिती मिळेल. किती वाजता पाऊस पडेल, किती वेळ पडेल, यासंदर्भात माहिती आधीच कळेल. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यास शासनाला तशा उपाययोजना करणे सोयीचे जाईल.

Leave a Reply