ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपटच जास्त; ओबीसी आरक्षणावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई: १९ जुलै- भाजपाकडून राज्यात ओबीसी जागर अभियानाचा आज मुंबईत शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. महाविकास आघाडीवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. सरकारच्या वेळकाढूपणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेलं. ओबीसींचं संपूर्ण आरक्षण संपवण्याचं काम या सरकारनं केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा झाला आहे. रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेलं आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसं सांगत असतात तसं ते बोलत असतात, अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई येथे आयोजित भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, खा. संगम लाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित आहेत.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आपलं सरकार असताना केस आली. तेव्हा केस काय होती? पाच जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्यावरच्या आरक्षणाविरोधातील ती केस होती. ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणाची केसच नव्हती. त्याही वेळेला आपण ५० टक्क्यांवरचं आरक्षण वाचवण्यासाठी एक अभ्यास केला आणि त्यातून एक अध्यादेश काढला. तो सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. ५० टक्क्यांच्यावरचं आरक्षणही मान्य करून पुढे जाण्याची मंजुरी दिली. हे सरकार आल्यानंतर या सरकारला राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता आणि इम्पेरिकल डेटा जमा करायचं परिपत्रक काढून सर्वोच्च न्यायालयाला द्यायचं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पाहिजे तितका वेळ दिला असता. या सरकारनं १५ महिने वाया घालवले. सात वेळा तारखा घेतल्या आणि कोणतीच हालचाल केली नाही.
राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी मोदी सरकारची स्तुती केली. देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली बहुजनांचं राज्य आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply