संपादकीय संवाद – महाआघाडी सरकारला असलाच तर खरा आशीर्वाद काँग्रेसचा शरद पवारांचा नव्हे

काल पुणे जिल्ह्यात एका विकासकामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला. त्यातून शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी असे विधान केले की शरद पवारांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आहेत याची जाणीव शिवसेनेने ठेवावी या वक्तव्यावरून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवी धुसफूस सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे.
तसे बघता अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यात काहीही चुकीचे नाही, मात्र शिवसेनेवर वरदहस्त ठेवतांना शरद पवारांनी कोणतीही साधुसंतांची कृती केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांचा व्यक्तिगत स्वार्थ पुढे आल्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकऱ्यांना आशीर्वाद देण्याचा हा निर्णय घेतला आहे. हे बघता अमोल कोल्हे यांनीही अशी निरर्थक कोल्हेकुई का करावी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उद्भवणे साहजिक आहे. राज्यात महाआघाडी सरकार अस्तित्वात आले त्याला कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तालोलुपता हेच होते, हे शेम्बडे पोरही सांगेल.
राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच शरद पवारांना राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नको होते त्यालाही कारण म्हणजे त्यांची फडणवीसांबाबतची व्यक्तिगत खुन्नस हेच होते. भाजपने फडणवीसांऐवजी दुसरा कुणी मुख्यमंत्री दिला असता तर कदाचित पवारांनी पुन्हा एकदा भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन उभे केले असते आणि शिवसेनेला त्यांच्याशी तडजोड करायला भाग पडले असते. मात्र भाजप नेते फडणवीसांना बाजूला करायला तयार नव्हते म्हणून पवारांना ही खेळी खेळावी लागली.
शिवसेनेलाही मुख्यमंत्रीपदाचा मोह सुटला होता कसेही करून त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक बसवायचा होता. त्यासाठी उद्धव ठाकरे तत्वशुन्य तडजोड करायला तयार झाले होते. अश्यावेळी बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहांनी शब्द दिला होता अशी कपोलकल्पित कथा उद्धव ठाकरेंनी समोर आणली आणि तेच निमित्त पुढे करून ज्या भाजपशी युती करून शिवसेना निवडणूक लढली होती त्या भाजपाशीच गद्दारी करून उद्धव ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली त्यावेळी सत्तेच्या लोण्याचा गोळा पटकावण्याची सज्ज असलेल्या बोक्याप्रमाणे शरद पवार तयारच होते. त्यांनी लगेच डाव टाकला आणि शिवसेनेला आपल्यासोबत घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच शरद पवारांच्या आशिर्वादामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे म्हणणे प्रसंगी धाडसाचेही मानले जाऊ शकते तास विचार केल्यास, आशीर्वादच म्हणायचे झाल्यास महाआघाडीला खरा वरदहस्त हा काँग्रेसचा लाभलेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊनही महाआघाडी सरकार बनणे शक्य नव्हते. त्यांना काँग्रेसच्या ४४ आमदारांची गरज होती, जर काँग्रेसने सत्तेत येण्याचे नाकारले असते तर हे सरकार बनणे शक्य नव्हते मग अश्या वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट आणि काही महिन्यांनी पुन्हा फेरनिवडणुका अशी परिस्थिती आली असती.
शरद पवारांनी या सरकारला आशीर्वाद दिला खरा मात्र त्याची पुरेपूर किंमतही त्यांनी वसूल केली आहे. उद्धव ठाकऱ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचे गाजर फेकून सर्व महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याच कडे ठेवली आहेत. म्हणजेच सत्तेचे खरे लोणी राष्ट्रवादीचं खाते आहे. शिवसेनेचे एक आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात या मुद्द्याचा उहापोह केला आहे. सर्व महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत आणि ते शिवसेनेच्या आमदारांचे कामही करत नाहीत असा सरळ दावा त्यांनी केला आहे. यावरूनच वास्तव स्पष्ट होते.
असे असले तरी राजकारणात मुजोरी करत आमचेच खरे असा दावा करायचा असतो अमोल कोल्हे यांनीही हाच दावा केला आहे. अमोल कोल्हे हे आधीचे शिवसैनिक मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यामुळेच या प्रकरणाचे आणखी एक नायक आढळराव पाटील यांनी हा कोल्हा आमच्या जोरावर मोठा झाला आणि आता आमच्यावरच कोल्हेकुई करतो आहे अशी टीका केली आहे. यावरूनच सर्वकाही स्पष्ट होते.

अविनाश पाठक

Leave a Reply